लिपिक संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’मार्फत राबवण्यासंबंधी सकारात्मक

(Last Updated On: October 6, 2020)

एमपीएससीच्या सदस्य नियुक्तीसाठी अर्ज प्राप्त झाले असून त्याची छाननी आणि नियुक्तीप्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. विविध परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया गतीने पार पाडण्यासाठी सदस्यांची सर्व पदे लवकरात लवकर भरणे आवश्यक असल्याचे मंत्री भरणे यांनी सांगितले.

मुंबई : राज्यातील शासकीय विभागांची सर्व लिपिक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र लोकसेवा अयोगाशी (एमपीएससी) निगडित बाबींची आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार सर्वश्री रोहित पवार, संजय शिंदे, अतुल बेनके यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव राहुल कुलकर्णी, श्रीमती गीता कुलकर्णी, श्रीमती सु. मो. महाडिक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव सु. ह. अवताडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट अ आणि ब संवर्गासाठी, पोलीस उपनिरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आदी काही गट क मधील पदांसाठी तसेच बृहन्मुंबईतील लिपिक संवर्गासाठीही एमपीएससीमार्फत भरतीप्रक्रिया राबवण्यात येते. तथापि, राज्यातील उर्वरित जिल्ह्यात बहुतांश गट ब अराजपत्रित आणि गट क मधील पदांची भरतीप्रक्रिया स्थानिक पातळीवर होते. त्यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करावा लागल्याने खर्च वाढत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
एमपीएससीच्या माध्यमातून केंद्रीकृत पद्धतीने एकाच वेळी या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी अशी मागणी उमेदवारांकडून येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सर्वच गट ब आणि गट क संवर्गासाठी पदांची भरती एमपीएससीच्या माध्यमातून राबविता येईल काय याबाबत चाचपणी करण्यात येईल. तथापि, प्रायोगिकतत्त्वावर सुरुवातीला लिपिक संवर्गासाठी एमपीएससीच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांना वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षेसाठी प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करण्याची गरज भासणार नाही. त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक-शारीरिक त्रास वाचू शकेल, असेही मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
आमदार रोहित पवार यांनी उमेदवारांच्या अनुषंगाने बैठकीच्या आयोजनाबाबत मागणी केली होती. बैठकीमध्ये एमपीएससी मुख्यालयाच्या बेलापूर येथील प्रस्तावित इमारतसंबंधी निविदा प्रक्रिया सुरू करण्याविषयी यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *