मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहारामध्ये अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाने अटी आणि शर्तींसह काल बुधवारी जामीन मंजूर केला. कारागृहातून सुटल्यानंतर रिया मध्यरात्रीनंतर दीड वाजता तिच्या घरी पोहोचली.
रिया चक्रवर्ती सुमारे 28 दिवस मुंबईतील भायखळ्याच्या महिला कारागृहात होती. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ती पोलिसांच्या उपस्थितीत बाहेर पडली. दरम्यान, तिच्या वाहनाचा कुणीही पाठलाग करू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता.
दुसरीकडे समाजातील प्रसिद्ध व्यक्ती किंवा लोकप्रिय मान्यवरांना कठोर शिक्षा दिली जावी़ यातून लोकांसमोर एक उदाहरण उभे राहिल, असा युक्तिवाद ‘एनसीबी’ने केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला. कायद्यासमोर सर्व समसमान आहे. ती अंमली पदार्थाच्या टोळीचा भाग नव्हती. तिने कथितरित्या आपल्यासाठी खरेदी केलेले अंमली पदार्थ हे पैशांसाठी किंवा फायद्यासाठी अन्य कुणालाही दिले नाहीत, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.