Home राष्ट्रीय केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

76

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे नेते तसेच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे.
मागील महिनाभरापासून रामविलास पासवान यांच्यावर उपचार सुरू होते. २ आॅक्टोबर रोजी एम्स रुग्णालयात पासवान यांच्यावर हृदयासंबंधी शस्रक्रिया पार पडली होती. ही दुसरी शस्रक्रिया होती. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या अनुपस्थितीत मुलगा चिराग याच्याकडे पक्षाची सूत्रे सोपवल्याचे पासवान यांनी जाहीर केले होते.
राजकीय कारकीर्द : रामविलास पासवान हे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्षही होते. लोकसभेत त्यांनी बिहारच्या हाजीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. रामविलास पासवान आपल्या ५० वर्षांच्या राजकीय जीवनात ११ वेळा निवडणूक लढले. यापैकी नऊ निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी व्ही. पी. सिंग, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र्र मोदी अशा सहा पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद सांभाळले आहे. अनेकदा त्यांनी केंद्र आणि बिहारमधील सरकारमध्ये किंग मेकरची भूमिका बजावली आहे. अनेक पक्षांशी जुळवून घेणे, हे त्यांच्या राजकीय यशाचे गमक मानले जाते.
पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दु:ख
मुंबई : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
रामविलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. ते व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये विविध खाती समर्थपणे सांभाळली. पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
सामान्यांचा नेता : मुख्यमंत्री ठाकरे
केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांच्या निधनाने दु:ख झाले. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती. त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.
दलित चळवळीमध्ये योगदान : भुजबळ
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा असून देशातील दलित चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. राजकारणातील त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न, धान्य वाटपाच्या योजनेत त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी नेत्याला जनता कायमची मुकली आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.