देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा गुन्हेदर कमी, गुहमंत्र्यांचा खुलासा

(Last Updated On: October 10, 2020)

मुंबई : देशाचा गुन्हेदर (crime rate of INDIA) वाढत असताना महाराष्ट्राचा गुन्हेदर मात्र 2018-19 च्या तुलनेत तोच राहिला असून महाराष्ट्र हे आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक गुन्हेदर केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांचा आहे. राज्याचा गुन्हेगारांना शिक्षा होण्याचा दरही वाढला आहे. 2018 मध्ये हा दर 41.41 होता तो 2019 मध्ये 49 टक्के झाला असून महाराष्ट्र राज्याचा क्रमांक अकरावा आहे. यात कर्नाटक 36.6, मध्य प्रदेश 47.00, गुजरात 45.6, तेलंगणा 42.5 टक्के असा दर आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
खुनासंदर्भातील गुन्हे
सन 2019 मध्ये देशात हिंसाचाराच्या एकूण 4.17 लाख गुन्ह्यांची नोंद झाली. तर राज्यात 2019 मध्ये हिंसाचाराचा गुन्हेदर केवळ 36 होता आणि राज्य 11 व्या क्रमांकावर होते. सन 2019 मध्ये देशाचा खुनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये गुन्हे दर 2.2 असा होता. त्यात महाराष्ट्राचा गुन्हेदर केवळ 1.7 असून महाराष्ट्र राज्य 25 व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न प्रकारात गुन्ह्यांबाबत महाराष्ट्र 17 व्या क्रमांकावर आहे.
स्त्रियांवरील अत्याचार गुन्हे
इतर राज्यांच्या तुलनेत प्रतिलक्ष महिला लोकसंख्येमागे महाराष्ट्र राज्य 13 व्या क्रमांकावर आहे. सन 2019 मध्ये बलात्काराचे राजस्थानमध्ये 5,997, उत्तरप्रदेश 3065, मध्य प्रदेश 2,485 आणि महाराष्ट्र 2,299 असे गुन्हे नोंदवले आहेत. या 2,299 गुन्हेगारांपैकी 2,274 गुन्हेगार हे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी असे ओळखीचे आहेत तर केवळ 25 गुन्हेगार अनोळखी आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर 3.09 असून महाराष्ट्र 22 व्या क्रमांकावर आहे. इतर राज्यांचा गुन्हेदर केरळ 11.6, हिमाचल प्रदेश 10, हरियाणा 10.9, झारखंड 7.7, मध्यप्रदेश 6.2 असा आहे.
भादंविचे गुन्हे : संपूर्ण देशात 2019 मध्ये भा.दं.वि.चे 32.25 लाख गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हेदर 278.4 असून महाराष्ट्र राज्य 8 व्या क्रमांकावर (प्रतिलाख लोकसंख्येनुसार) आहे. यात मध्य प्रदेश, हरयाणा, केरळ, राजस्थान, तेलंगणा यांचा दर जास्त असून उत्तर प्रदेश या गुन्ह्यांमध्ये प्रथमस्थानी आहे. अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्र 9 व्या स्थानी आहे. यात राज्यात केवळ 910 गुन्ह्याची नोंद आहे. दुसरीकडे उत्तरप्रदेश 25,524, मध्य प्रदेश 3847, बिहार 2976, राजस्थान 2095 असे गुन्हे नोंद आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *