ओबीसींचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती : मुख्यमंत्री

(Last Updated On: October 10, 2020)

मुंबई : ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत काल शुक्रवारी एका बैठकीत ते बोलत होते. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नसून त्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. आपण टप्प्याटप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. कोरोना संकटामुळे कामांची गती मंदावून आरोग्य या विषयाची प्राथमिकता वाढली. आता आपण अनलॉक प्रक्रियेमध्ये जीवनाला पुन्हा गती देत असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
बैठकीत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह उपस्थित ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *