मुंबई : सध्या कोरोना संकटात मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी़ कारण आता मास्क हाच आपला ब्लॅक बेल्ट असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना अजून आपल्यातून गेला नाही. जगात काही देशात तर याची दुसरी लाट आली आहे त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत. शासनाची जनतेप्रति जबाबदारी आहे. जनतेच्या प्रेमापोटीच मंदिरे, लोकल आणि जिमसंबंधी निर्णय अजून घेतलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही याचा पुनरुच्चार करताना मुख्यमंत्र्यांनी जनतेला ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) लावण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, शिस्त पाळा, आरोग्य सांभाळा असे आवाहनही केले.
नवरात्रोत्सव साधेपणाने
मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन केले. त्यांनी संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या शिकवणुकीचे स्मरण केले. ते म्हणाले, की आपल्या संतांची शिकवण ही आपल्या जगण्याचा आयुष्यभराचा संस्कार आहे. आजही कोरोना आपल्यातून गेला नाही. त्यामुळे आतापर्यंत सर्व धर्मियांनी जसे सगळे सण समारंभ साधेपणाने साजरे केले तसेच येणारे नवरात्र आणि दसरा दिवाळीही साधेपणाने साजरे करावेत.
नुकसानभरपाई मिळणार
राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकºयांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. शेतकºयांनी निश्चिंत राहावे, शासन त्यांना त्यांची नुकसानभरपाई देईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.