वर्धा, भंडारा, रामटेक मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे धावणार

उपराजधानी नागपूर राजधानी मुंबई

मुंबई/ नागपूर : नागपूर शहर व परिसरात रेल्वेच्या सध्याच्या पॅसेंजर गाड्यांऐवजी आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित ‘ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन’ सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्व्हिस) ही सेवा जोडली जाईल.
महामेट्रोने यासाठी 333.60 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सादर केला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे सहाय्य म्हणून 21.30 कोटी रुपये राज्य शासनाकडून बिनव्याजी दुय्यम कर्जसहाय्य म्हणून देण्यात येईल. याव्यतिरिक्त भविष्यात देखील राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. महामेट्रो, राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारनाम्यास कार्योत्तर मंजुरीही देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा खर्च नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-1 या प्रकल्पासाठी केएफडब्ल्यू या वित्तीय संस्थेच्या 305 कोटी 20 लाख रुपये या मंजूर कर्ज सहाय्यामधून करण्याचे प्रस्तावित आहे.
ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नागपूर ते वर्धा, नागपूर ते नरखेड, नागपूर ते रामटेक आणि नागपूर ते भंडारा रोड या मार्गांवर सुरू होणार असून यामध्ये 42 स्थानके उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे वेगवान आणि आरामदायी प्रवास होईल तसेच रहदारीचा भाग नागपूर मेट्रोकडे वळेल. चांगल्या परिवहन सेवेमध्ये या संपूर्ण प्रदेशाचा विकास होण्यास देखील मदतच होईल, असे ठरवण्यात आले.(सांकेतिक छायाचित्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *