राज्यातील ग्रंथालये तसेच संशोधन-प्रयोगशाळा खुल्या होणार

(Last Updated On: October 14, 2020)

मुंबई : महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांची उद्या (१५ आॅक्टोबर) जयंती आहे. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर राज्यातील विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडीत संशोधन संस्थांतील प्रयोगशाळा आणि सर्व प्रकारची ग्रंथालये खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
‘मिशन-बिगीन-अगेन’च्या अनुषंगाने निर्गमित निर्देशांमध्ये ग्रंथालये आणि संशोधन प्रयोगशाळा खुल्या करण्याबाबत नियमही नमूद करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोविड-१९ च्या आरोग्य दक्षतेच्या सर्व नियमांचे पालन करून या दोन्ही ठिकाणी नेहमीचे कामकाज करता येणार असल्याचे म्हटले आहे.
पुस्तकांवर अपार प्रेम करणारे आणि देशाला विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर ठेवण्यासाठी अविरत झटणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी केली जाते. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित उच्च शिक्षण संस्थामधील संशोधन-प्रयोगशाळा आणि राज्यातील शासकीय व खासगी अशा सर्व ग्रंथालयांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. ग्रंथालये खुली होण्याने वाचनप्रेमी तसेच विविध विषयातील संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *