सेंद्रीय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा स्थापनेचे निर्देश

(Last Updated On: October 15, 2020)

मुंबई : राज्यात सेंद्रीय शेतीला चालना देण्याकरिता राज्य सेंद्रीय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
सेंद्रीय उत्पादन प्रमाणीकरण यंत्रणा उभारणीबाबत मंत्रालयात बुधवारी बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही यंत्रणा तातडीने उभारण्यासंदर्भात विभागाला सूचना दिल्या. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.
भारतात खासगी संस्थांमार्फत सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरण केले जाते. त्यासाठी राज्यामध्ये शासकीय यंत्रणा उभी करुन या शेतीला चालना देतानाच शेतकºयांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. उत्पादने प्रमाणीकरण यंत्रणेच्या स्थापनेसाठी 11 सदस्यीय नियामक मंडळाची रचना प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी आकृतीबंध तयार करण्यात आला आहे.
‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत पिकविलेला भाजीपाला, फळे स्थानिक ठिकाणी विकण्यासाठी यंत्रणा निर्माण करून देण्यात येत असून त्यासाठी कृषी विभागातर्फे छत्री असलेला स्टॉल उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. यामुळे शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करणे शक्य होईल. विशेषत: महामार्गालगत अशा विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *