बॉलीवूडला संपवण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत

(Last Updated On: October 15, 2020)

मुंबई : बॉलीवूडची बदनामी दु:खदायक असून या महत्त्वपूर्ण अशा बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रकार कधीही सहन केले जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज ‘हॉलीवूड सिनेमां’ना तोडीस तोड असे चित्रपट याठिकाणी निर्माण होत आहेत. या चित्रपटांचा चाहतावर्ग जगभर आहे. चित्रपटसृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून अनेकांना रोजगाराची संधी मिळते. शिवाय आपले कलाकार लोकप्रिय होतात; परंतु काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलीवूडला बदनाम करण्यात येत असल्याची चिंता मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.
कोरोना संसर्गामुळे राज्यातील चित्रपटगृहे सहा महिन्यांहून अधिक काळ बंद असून याअनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे मालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली.
बैठकीस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह सिंगल स्क्रिन ओनर्सपैकी उदय टॉकीजचे नितीन दातार, पीव्हीआर सिनेमाचे संजीव, युएफओ मुव्हीजचे कपिल अग्रवाल, संजय गायकवाड, राजेश मिश्रा, पीव्हीआरचे अजय बिजली, कमल ग्वानचंदानी आशीर्वाद थिएटर्सचे अक्षय राठी, आयनॉक्सचे आलोक टंडन, सिद्धार्थ जैन, सिनेपॉलीसचे देवांग संपत, कार्निव्हलचे कुणाल सोहनी, सिटी प्राईडचे प्रकाश चाफलकर, राहुल हसकर, अटारिया मॉलचे कुणाल वर्धन, झेविअर सोटोमेअर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राने पुनश्च: हरिओम करीत कामगारांना काम मिळावे यासाठी उद्योगक्षेत्र सुरू केले. त्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने चालवण्याबाबत नुकतीच परवानगी देण्यात आली. आता मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी लोकलच्या फेºयाही वाढविण्यात आल्या आहेत. राज्यातील चित्रपटगृहांबाबतही सकारात्मकता ठेवून निश्चित करण्यात आलेल्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार (एसओपी) चित्रपटगृहे केली जातील. मनोरंजन क्षेत्र राज्याच्या अर्थचक्राला गती देणारे असल्याने ते बंद ठेवण्यात कुणालाही आनंद नाही.
चित्रपटगृहांतील वातानुकूलित वातावरणात प्रेक्षक किमान दोन तास बंदिस्त ठिकाणी असतो, अशावेळी त्याला संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छता पाळली जाणे, प्रेक्षकांच्या जागा वेळोवेळी सॅनिटाईज करणे, एकूण आसनक्षमतेच्या फक्त ५० टक्के प्रेक्षक असणे याबाबी पाळल्या जाणे गरजेचे आहे. एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, प्रेक्षकांनी मास्क लावणे, सॅनिटाईज करणे आणि शारीरिक अंतर पाळणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *