वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालये महत्त्वाची : सामंत

राजधानी मुंबई

मुंबई : वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य मध्यवर्ती ग्रंथालय येथे आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्षाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, लेखक विश्वास पाटील, ग्रंथालय संचालनालय संचालिका श्रीमती शालिनी इंगोले आदी उपस्थित होते.
ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ग्रंथालये सुरू होत आहेत. ‘वाचन प्रेरणा दिन’ केवळ विशिष्ट दिवशी साजरा न करता तो 365 दिवस साजरा करण्यात यावा. विशेषत: वाचनाची चळवळ गावोगावी जाण्यासाठी हा दिवस गाव पातळीवर साजरा होणे आवश्यक असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.
ग्रंथालय चळवळ रुजण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. भारतरत्न अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच दिनी शासनाने ग्रंथालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सर्वस्तरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. डॉ. कलाम यांच्या अनमोल साहित्याचे वाचन सर्वांनी करीत त्यांचे विचार आचरणात आणावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *