कोरोना संकटकाळात 85 हजार बेरोजगारांना रोजगार

राजधानी मुंबई

मुंबई : कोरोना टाळेबंदीच्या काळात कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले आॅनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकूण 85 हजार 428 इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
फक्त सप्टेंबर महिन्यात 32 हजार 969 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान एकूण 1 लाख 17 हजार 843 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टल सुरू केले आहे. पोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. शिवाय कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉपोर्रेट्स हे सुद्धा नोंदणी करून कुशल उमेदवार शोधू शकतात. माहे सप्टेंबरमध्ये या वेबपोर्टलवर 63 हजार 593 उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात 27 हजार 252, नाशिक विभागात 6 हजार 644, पुणे विभागात 11 हजार 681, औरंगाबाद विभागात 9 हजार 161, अमरावती विभागात 5 हजार 009 तर नागपूर विभागात 3 हजार 846 बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे 32 हजार 969 उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक 20 हजार 805, नाशिक विभागात 2 हजार 244, पुणे विभागात 4 हजार 187, औरंगाबाद विभागात 3 हजार 128, अमरावती विभागात 1 हजार 293 तर नागपूर विभागात 1 हजार 312 इतक्या उमेदवारांना रोजगार मिळाला. कौशल्य विकास विभागाने कोरोना काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *