Home मुंबई सरकारचा जोर, राज्यातील व्यायामशाळा सुरू होणार

सरकारचा जोर, राज्यातील व्यायामशाळा सुरू होणार

34

स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा पूर्णपणे बंद

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांच्या सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा येत्या दसरा सणापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा जनतेच्या आरोग्यासाठी असल्या तरी या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार केलेल्या ‘एसओपी’चे (विशेष नियम) काटेकोर पालन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेत ते बोलत होते.
जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची ग्वाही प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना दिली; पण स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामूहिक व्यायाम प्रकार पूर्णपणे बंद राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, डॉ. शशांक जोशी तसेच महाराष्ट्र जिम ओनर्स असोसिएशनचे निखिल राजपुरीया, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य, करण तलरेजा, अभिमन्यू साबळे, महेश गायकवाड, हेमंत दुधवाडकर, साईनाथ दुर्गे, राजेश देसाई, योगिनी पाटील आदी उपस्थित होते.
मोठ्या शहरांबरोबच राज्यातील ग्रामीण भागातही जिम, व्यायामशाळा यांची संख्या लक्षणीय आहे. हा व्यवसाय जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. देशातील आता रुग्ण संख्या कमी होत असली तरी युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्यालाही सावध राहावे लागेल. आपण अनेक निर्बंध शिथिल करत आहोत. मात्र, यातून हळूहळू गाफीलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

व्यायामशाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे. व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोणकोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारीरिक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारीरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निजंर्तुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निजंर्तुकीकरण करणे. दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतरही पूर्णपणे निजंर्तुकीकरण करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here