तुम्ही सुरक्षित राहा, काळजी शासन घेईल : मुख्यमंत्री

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्त शेतकºयांना धीर दिला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथे आपत्तीग्रस्तांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रामपूर येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. प्रत्यक्ष पडझड झालेल्या घरात जाऊन नागरिकांना दिलासा दिला. शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. हवामान खात्याने 22 आणि 23 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची, पशुंच्या जीवांची काळजी घ्यावी. शासन तुमची काळजी घेईल, नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करेल.
रमेश बिराजदार हा शेतकरी तब्बल 24 तास झाडावर आणि पाण्यात होता. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी त्यांना बाहेर काढले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बिराजदार यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. उपचार घेतले का, तुम्हाला आता काही त्रास होतोय का, अशी विचारणा त्यांनी केली. रडत रडतच त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *