मुंबई

राज्यातील मोठी राजकीय उलथापालथ

(Last Updated On: October 20, 2020)

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश जवळ जवळ निश्चित झाला असल्याचे मानले जात आहे. त्यांच्यासोबत उत्तर महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठी वृत्तवाहिनी ‘टीव्ही 9 मराठी’ ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा माध्यमातून सुरू होत्या. 15 आॅक्टोबरनंतर त्याला अधिक जोर मिळाला़ आता येत्या गुरुवारी म्हणजे 22 आॅक्टोबर ही तारीख नक्की झाल्याचेही वृत्तवाहिनीने म्हटले आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
तसेच, मागील आठवड्यात खडसे यांच्या प्रवेशाबद्दल मुक्ताईनगरमध्ये बैठक पार पडली होती. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह आपण लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहोत, अशी माहिती
धुळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी सांगितले होते.
दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेशामुळे राज्यातील बरीच राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे जाणकार सांगताहेत.