नागपूर

वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी कारवाई: गृहमंत्री

(Last Updated On: October 20, 2020)

नागपूर : विशेष तक्रार निवारण शिबिर हा राज्यातील भूमाफियांवर निर्बंध घालणारा पहिला पथदर्शी प्रकल्प आहे. यामाध्यमातून भूखंडाच्या बाबतीत फसवणूक तसेच वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या तक्रारींचा त्वरित निपटारा
होईल. प्रतिसादानुसार अन्य शहरात देखील हा उपक्रम राबवण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलिस जिमखाना येथे सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. शिबिरात एकूण 50 तक्रारदारापैकी 47 तक्रारदार उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री यांनी स्वत: जातीने सर्वांची अडचण समजून घेतली. तक्रारी अर्जात प्रामुख्याने फसवणूक, बनावट दस्ताऐवज तयार करून भूखंड बळकावणे,जबरीने जमिनीचा कब्जा घेणे, अतिक्रमण करणे, अवैध बांधकाम करणे, महिलांच्या समस्या, वाहतूक संबंधी समस्या आदी स्वरुपाच्या तक्रारी जाणून घेत आठ प्रकरणात प्रथमदर्शनी गुन्ह्याचे स्वरुप दिसून येत असल्याने त्याबाबत चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. तसेच,12 प्रकरणांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. उर्वरित तक्रारी अर्जांची पाहणी करून संबंधित परिमंडळांचे उप आयुक्त यांनी स्वत: लक्ष देवून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासह एकूण 10 प्रकरणात पोलिस विभाग व इतर शासकीय विभागाकडून संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.

प्रास्ताविकात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, की गृहमंत्री अनिल देशमुख यांची संकल्पना तसेच मार्गदर्शनातून विशेष तक्रार निवारण शिबिरातून तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. गुन्हेगारांवर वचक बसविणे तसेच नागरिकांना दिलासा देणे हे पारदर्शक प्रशासनाचे कार्य आहे. यासाठी नागपूर पोलिस विभाग नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनिल फु लारी, अप्पर पोलिस आयुक्त (दक्षिण विभाग) दिलीप झळके, अप्पर पोलिस आयुक्त (उत्तर विभाग) नवीनचंद्र रेड्डी, सर्व परिमंडळ / शाखेचे उपायुक्त, शासकीय विभागाचे प्रतिनिधी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, मुख्य अभियंता सुनिल गझुलवार, सहकार विभागाचे ए.बी. कडू, मुद्र्रांक नोंदणी विभागाचे अ.स. उघडे, महानगरपालिका उप आयुक्त मिलींद
मेश्राम उपस्थित होते. याशिवाय तक्रारदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांनी केले. सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) सुधीर नंदनवार यांनी मानले.