मुंबई

अतिवृष्टीमुळे खराब रस्ते,पुलांच्या दुरुस्तीचे निर्देश

(Last Updated On: October 20, 2020)

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे वाहून गेलेले रस्ते व पुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.
राज्यात मागील काही महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्ते व पुलांच्या नुकसानीचा आज ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून विभागनिहाय आढावा घेतला.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अजित सगणे, सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे यांच्यासह राज्यातील सर्व विभागातील मुख्य अभियंते व कार्यकारी अभियंते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
श्री.सौनिक व श्री. देबडवार यांनी पाऊस व पुरामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते व पुलाच्या झालेल्या हानीची माहिती दिली. तसेच, प्रत्येक विभागातील मुख्य अभियंत्यांनीही आपापल्या कार्यक्षेत्रातील माहिती दिली.
मंत्री चव्हाण यांनी राज्याचा आढावा घेऊन सांगितले, की पुरामुळे झालेल्या रस्ते व पूल दुरुस्ती, नवीन रस्ते बांधणी यासाठी तातडीने निधी देण्यात येईल. ज्या ठिकाणी रस्ते खराब झाल्यामुळे वाहतूक बंद पडली आहे, अशा ठिकाणी ते प्राधान्याने दुरुस्त करून रस्ते वाहतूक योग्य करावी. ही कामे करताना त्यांचा दर्जा व गुणवत्ता नियंत्रणावर मुख्य सचिवांनी लक्ष ठेवावे.