मुंबई

अनाथ बालकांची गटवारी करण्याचे निर्देश

(Last Updated On: October 22, 2020)

मुंबई : अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा ‘अ’ गट करावा. ज्याचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहिती आहे, अशा बालकांना ‘ब’ गटात समावून घेण्यासंदर्भात बदल करणे आवश्यक आहे. तसेच, नोकºयांमधील अनाथांसाठी असलेला आरक्षणाचा निकष हा एकूण रिक्त पदाच्या एक टक्केनुसार असावा, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे आदेश मंत्री बच्चू कडू यांनी दिले.
अनाथ बालकांच्या हक्कासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, कामगार, बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. मागासवर्गीयांच्या धर्तीवर अनाथ तरुणांना बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.
आतापर्यंत किती अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र दिले त्याची माहिती सादर करावी. प्रमाणपत्र नाकारण्यात आलेल्यासंदर्भात सुनावणी घेण्यात यावी. अनाथालय अथवा अनाथ आश्रम संस्थेतून बाहेर पडलेल्या अनाथांची माहिती गोळा करावी. अनाथ बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच, यावर्षी दाखल झालेल्या व अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्यांसाठी येत्या 14 नोव्हेंबरपासून विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना मंत्र्यांनी केल्या.
सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांचा लाभ अनाथांना होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. या योजनांमध्ये त्यांच्यासाठी 1 टक्का आरक्षण ठेवण्याबाबत व अपंगांच्या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नातील एक टक्का निधी अनाथांसाठी खर्च करण्यासंदर्भात संबंधित विभागाना सूचित करण्यात यावे. इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर संत गाडगेबाबा अनाथ घरकुल योजना राबविण्यात यावी. अनाथालयात असलेल्या बालकांना त्यांना बालसंगोपन योजना व संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ मिळावा, यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावे, असेही त्यांनी सांगितले.