मुंबई

सीबीआयला महाराष्ट्रातील तपासासाठी परवानगी घ्यावी लागणार

(Last Updated On: October 22, 2020)

मुंबई : महाराष्ट्र राज्यात केंद्रीय तपास संस्था अर्थात सीबीआयला तपास करायचा असल्यास आता महाराष्ट्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने केंद्र्राशी असलेला परवानगी आदेश काढून घेतला आहे. अशाप्रकारचा निर्णय घेणारे देशात चौथे राज्य ठरले आहे़ यापूर्वी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
विशेष पोलिस आस्थापना अंतर्गत सीबीआयला राज्यात येऊन तपासाचे अधिकार होते. आता राज्याच्या गृहमंत्रालयाने 21 आॅक्टोबर रोजी तपासाची परवानगी मागे घेण्यासंबंधीचा ‘जीआर’ जारी केला आहे. ‘दिल्ली पोलिस विशेष आस्थापना अधिनियम, 1946 च्या कलम 6 नुसार प्रदान केल्याचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे दिल्ली पोलिस विशेष आस्थनापना अधिनियमातील सदस्यांना महाराष्ट्र राज्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाराचा वापर करण्यासाठी शासन आदेश गृह विभाग क्र. एमआयएस-0189/प्र.क 28/पोल-3 दिनांक फेब्रुवारी 22, 1989 द्वारे अथवा इतर कोणत्याही आदेशाद्वारे वेळोवेळी देण्यात आलेली संमती मागे घेत आहे, असे त्यात नमूद केले आहे.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. त्यानंतर टीआरपी घोटाळ्याचा तपासही सीबीआयकडे जाण्याच्या शक्यतेमुळे महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.