एकनाथ खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश

राजधानी मुंबई

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( EKNATH KHADASE ) उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहे. त्यांच्या कन्या रोहिणी सुद्धा यावेळी राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेणार असून अन्य पदाधिकारी, कार्यकर्तेही ‘घड्याळ’ आपल्या मनगटावर बांधणार असल्याचे समजते. खडसे यांच्या प्रवेशाबाबत ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काल शिक्कामोर्तब केले होते.
जळगावातून आज मुंबईकडे रवाना होत असताना खडसे यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी घोषणा देत त्यांना जोरदार पाठिंबा दर्शवला.
भारतीय जनता पक्षात होणारा अन्याय लोकांनी पाहिला आहे. शुक्रवारी खडसे यांच्याबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत. एकनाथ खडसे यांच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ नक्कीच वाढेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षापासून आपणांस जाणीवपूर्वक डावलण्यात येत असल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, भाजपच्या काही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. एकनाथ खडसे यांचे पक्ष सोडणे धक्कादायक असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या घडामोडीवर चिंतन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
नाराजी ही सुद्धा…

मागील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना संधी दिली होती. मात्र, निवडणूक प्रचारातून भाजप कार्यकर्त्यांनी अंग काढून घेतल्याने रोहिणी यांचा पराभव झाला होता. पक्षांतर्गत दगाबाजीमुळेच हा पराभव झाला असून मोठे नेते जबाबदार असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. आता त्यांची खासदारपदी असलेल्या सूनबाई रक्षा खडसे आपणासोबतच भाजपमधून बाहेर पडल्यास लोकसभेच्या पोटनिवडणुकीत असाच दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेत रक्षा यांना त्याच पक्षात ठेवण्याचा निर्णय एकनाथ खडसे यांनी घेतला असू शकतो, असे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *