Home BREAKING NEWS अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत

25

मुंबई : राज्यात जून ते आॅक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
शासकीय निवासस्थान वर्षा येथे आज झालेल्या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले, की नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १० हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टर याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येईल. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल.
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतपिकांप्रमाणेच पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाला या सुविधांच्या पुनर्उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. या १० हजार कोटी रुपयांमध्ये कृषी क्षेत्रासाठी ५५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यानंतर रस्ते आणि पुल यासाठी २६६५ कोटी, नगरविकास विभागासाठी ३०० कोटी, महावितरण आणि उर्जा विभागासाठी २३९ कोटी, जलसंपदा विभागास १०२ कोटी, ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा विभागास १ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. अतिवृष्टीने रस्ते, पुल, विजेच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा योजना, घरे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत इमारती आणि शेतजमिनीचे जे नुकसान झाले त्याची कामे या निधीतून केली जातील,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीपूर्वी मदत पोहोचवा
माझ्यासह सर्व विभागाच्या मंत्र्यांनी राज्यभर फिरून आपत्तीचा आढावा घेतला असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, या संकटात शेतकºयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सण समारंभापूर्वी ही मदत शेतकरी आणि नुकसानग्रस्त बांधवांच्या हातात पोहोचेल असा शब्द दिला होता. तो पाळणार असून दिवाळीच्या आधी सर्व नुकसानग्रस्तांना ही मदत पोहोचवावी, असे निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here