मुंबई : आयुष्यातील तब्बल 40 वर्षे भाजपमध्ये काम केले. पण,
माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, भूखंडाच्या चौकश्या लावल्या, कुणी किती भूखंड घेतले ते मी सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. माझ्यामागे कुणी ‘ईडी’ लावली तरी मीही ‘सीडी’ लावीन, असा दमदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला.
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी आणि कन्या रोहिणी यांनीही राकाँमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, सध्या पक्षात कुणीही नाराज नसून मंत्रिमंडळातील खात्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. एकनाथ खडसेंना कसलीही अपेक्षा नाही आणि ते सुद्धा काही बोलले नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
काही प्रतिक्रिया
-नाथाभाऊंच्या या निर्णयाने उत्तर महाराष्ट्र अनाथ होणार आणि राष्ट्रवादीला नाथ मिळाल्याने त्यांना चांगले दिवस येतील : मंत्री बच्चू कडू
-खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपचा खान्देशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊना नक्कीच न्याय मिळेल : मंत्री धनंजय मुंडे
-राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांचे राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने आम्हाला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार