नागपूर

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साजरा करा : डॉ. नितीन राऊत

(Last Updated On: October 25, 2020)

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुद्ध तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (dr niteen raut) यांनी केले.
दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभाकक्षात आज आढावा बैठक घेण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन यावर्षी साजरा केला जाणार नाही. तथापि, या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी त्यांनी आढावा घेतला.
पालकमंत्री डॉ. राऊत यांनी अनुयायांना आवाहन करताना आपल्या कुटुंबासोबत घराघरात अभिवादन करावे. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाची झळ देशासह संपूर्ण जगाला बसत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने नागरिकांनी कोणतेही सण, समारंभ सामूहिकरित्या साजरे करू नये, असे आवाहन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 आॅक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवशी विजयादशमीचा सण होता. यामुळे विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी येथे तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात. मात्र, यंदा कोरोना संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी आपल्या घरीच धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणाने साजरा करावा, असेही पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले.