Home राजधानी मुंबई हिंमत असेल सरकार पाडून दाखवा, शिवसेना पक्षप्रमुख गरजले

हिंमत असेल सरकार पाडून दाखवा, शिवसेना पक्षप्रमुख गरजले

81

मुंबई : काहीजण तारीख पे तारीख देताहेत. अनेकजण स्वप्नं पाहताहेत. संबंधितांनी हिंमत असेल सरकार पाडून दाखवावे, असा परखड दम शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra chief minister udhhav thakare) यांनी दिला़ ते आज दसरा मेळाव्यानिमित्ताने बोलत होते.
महाराष्ट्र ही वाघाची औलाद आहे, आडवं आल्यावर काय होते. याचा इतिहास असून भविष्यातही समजेल़ खोटे आरोप, आळ घेतले जाताहेत; पण आम्ही शांत राहिलो. टक्कर देण्याची खूमखूमी असेल त्यांनी प्रयत्न करावा. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख म्हणून संयमाने बोलण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा होता. त्यामुळे ते मागील वर्षभरातील महाराष्ट्र आणि देशातील एकूण घडामोडीबद्दल मेळाव्यात काय भाष्य करणार याकडे संपूर्ण देशाचे लागले होते. अर्थातच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सडेतोड भाषणातून विरोधकांना चांगलेच सुनावले.
सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाच्या मागील वर्षभरातील प्रवास विरोधकांचा समाचार घेत उलगडून सांगितले. भविष्यात शिवसेनेने दिल्लीचे तख्त राखण्याच्या दिशेने वाटचाल केल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कितीही चिखलफेक झाली तरी ठाकरे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असून त्यानंतरची 25 वर्षे आपलेच सरकार असेल, असेही संजय राऊत यांनी जोर देत सांगितले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते तसेच मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, आनंद अडसूळ, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.