मुंबई

एमएचटी-सीईटी २०२० बाबत महत्त्वाचे निर्देश

(Last Updated On: October 25, 2020)

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट प्रत्येक अभ्याक्रमाकरिता ५ टक्के समांतर आरक्षण विहित करण्यात आले असून या प्रवेशाकरिता प्रत्येक संस्थेमध्ये असलेली जास्तीत जास्त ५ जागांची प्रचलित अट चालू शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येत आहे.एमएचटी – सीईटी २०२० आॅनलाईन प्रवेश परीक्षेकरिता ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते; परंतु कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव आणि अतिवृष्टीमुळे परीक्षेस उपस्थित राहिले नाहीत,अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, प्रवेश नोंदणीसाठी सोमवारी २६ आॅक्टोबर २०२० रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिवाय या उमेदवारांची परीक्षा पुढील १५ दिवसांत घेण्याच्या सूचनाही विभागास दिल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठांमध्ये आॅनलाईन परीक्षांबाबत काही ठिकाणी अडचणी आल्या आहेत. त्याबाबत चौकशी करून परीक्षा संचालन करणाºया संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. यासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती गठीत करण्यात आली आहे. ज्या विद्यापीठांना आपल्या परीक्षा ३१ आॅक्टोबर २०२० पावेतो घेणे शक्य नाही, त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग, मा. राज्यपाल व राज्य शासनास अहवाल सादर करावा.
तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बाकी आहे अथवा अन्य कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित परीक्षा येत्या दिवाळीपूर्वी घेण्यात याव्यात. आणि कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख राहणार नाही. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.