देश

‘अनलॉक 5.0’ ची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत

(Last Updated On: October 27, 2020)

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘अनलॉक 5.0’ ची मुदत आगामी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली बंधने पुढील महिनाभर कायम राहणार आहेत. कोरोनाची साथ अद्याप संपलेली नसल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन सुरूच असेल, असेही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
अनलॉकच्या प्रक्रियेनुसार जवळपास अनेक बंधने वगळण्यात आली असून काही बंधनेच उरलेली आहेत. नागरिकांनी मास्क (कापडी मुखावरण) आणि शारीरिक दूरतेचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करावे़ मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका टळलेला नाही असेही सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, जगातील अन्य देशांसह भारतही मागील 8 ते 9 महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाशी लढा देत आहे. 22 मार्चपासून पहिल्यांदाच देशाचा मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.