मुंबई विदर्भ

आरटी-१ वाघ जेरबंद; मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

(Last Updated On: October 29, 2020)

 

मुंबई/  चंद्रपूर : मध्य चांदा भागात दहशत माजवणाºया आरटी-१ वाघास ( RT 1 )  मंगळवारी दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.
मागील काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता; पण पुन्हा त्याला सापळा लावून पकडण्यात आले. हा वाघ सुमारे वीस चौरस किलोमीटर परिसरात फिरत होता. त्याला पकडण्यासाठी मुख्य वन्यजीव रक्षक यांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी आदेश दिलेले होते. तेव्हापासून वन विभागाची पथके त्याच्या मागावर होती. विशेष म्हणजे अंधारातच त्याचा अधिक वावर होता. या वाघाला जिवंत पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील २५ वनरक्षकांची चार पथके, १४ गावांतील ३५ स्वयंसेवक यांच्यासह चार पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी प्रयत्न करत होते. वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरेही लावण्यात आले होते.
मागावर असलेल्या पथकांनी पुन्हा प्रयत्न सुरु केले. यात चांदा वन विभागातील राजूरा व विरुर वनपरिक्षेत्रात सिंदी गावाजवळ रेल्वेच्या पुलाखाली लावलेल्या सापळ्यात हा वाघ अडकला. या वाघाला पशुवैद्यकीय पथकाच्या मदतीने बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या वाघास जिवंत जेरबंद करण्यात आल्याने वन विभागाचे मोठे यश मानले जात आहे.