विदर्भ

पाणीपुरवठा योजनेसाठी ‘सोलर पॉवर’चा वापर

vijay vadettiwar
(Last Updated On: November 2, 2020)

चंद्रपूर : विद्युत पुरवठ्यातील तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडतात़ त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता जिल्ह्यात अभिनव प्रयोग म्हणून दोन ते तीन मेगावॅट उर्जेचा सोलर पॉवर प्रकल्प उभारण्यात येईल, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सांगितले.
सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, नियोजन उपायुक्त श्री. सुपे, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नियोजन अधिकारी अधिकारी गजानन वायाळ, उपविभागिय अधिकारी रोहन घुगे प्रामुख्याने उपस्थित होते.
पिकांवर मावा, तुडतुडे, बोंडअळी, लाल्या या रोगांमुळे धाण्य व कापूस पिकांचे 5 हजार 700 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून रोग अजूनही पसरत असल्याने सर्व नुकसान ग्रस्तांच्या शेतीचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून जिल्ह्यासाठी मदतनिधी खेचून आणू,असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, पिक विमा कंपन्यांकडूनही तातडीने मदत मिळावी म्हणून लवकरच त्यांचेसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.