विदर्भ

धर्मगुरू डॉ.रामराव महाराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

(Last Updated On: November 2, 2020)

वाशिम : देशातील बंजारा समाजबांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर आज श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, वनमंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित अनुयायी, भाविकांनी साश्रुनयनांनी डॉ. रामराव महाराजांचे अंतिम दर्शन घेतले.
संत सेवालाल महाराजांचे वंशज असलेल्या तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी रात्री मुंबई येथे देहावसान झाले. त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव काल रात्री उशिरा पोहरादेवी येथे आणण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह भाविकांनी अंत्यदर्शन घेतले.
अंत्यसंस्कारापूर्वी तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव जगदंबा देवी मंदिर व संत सेवालाल महाराज मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा मठाच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या अंत्यविधीस्थळी आली. यावेळी उपस्थित अनुयायी, भक्तांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पोलिस दलाच्यावतीने बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंत्रोच्चारानंतर परिवारातील सदस्यांनी डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, खासदार उमेश जाधव, आमदार निलय नाईक, आमदार राजेश राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार इंद्र्रनील नाईक, आमदार तथा माजी मंत्री मदन येरावार, आमदार तुषार राठोड, आमदार प्रभू चव्हाण, वाशिमचे जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, वाशिमचे पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री संजय देशमुख, मखराम पवार, माजी आमदार अनंतकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.