अमृता...womenworld

स्तनदा मातांचे मनोरंजनातून पोषणही…

(Last Updated On: November 2, 2020)

कोरोना साथीच्या काळात स्तनदा माता, लहान बालके अशा 74 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्यात आला. या काळात अनेक अडचणी ठिकठिकाणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र, विभागाच्या सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय पोषण माह 2020 मध्ये राज्याचा देशात पहिला क्रमांक आला आहे. आता ‘सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र’ हे ध्येय साध्य करण्यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला असून त्याद्वारे पोषणविषयक माहिती चित्रफितींच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविले जाणार आहे.
‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा आयव्हीआर (इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) प्रणालीवर आधारित डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ( digital social media platform ) आहे. या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधून सुपोषणाबाबत माहिती, मार्गदर्शन केले जाणार आहे. पोषणविषयक जनजागृतीसाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ मध्ये हेल्पलाइन, ब्रॉडकास्ट कॉल, व्हॉट्स अ‍ॅप, चॅटबोटचा समावेश आहे. 8080809063 या क्रमांकावरून गरोदर महिला, स्तनदा मातांना व्हिडिओ, आॅडियो, व्हॉट्सअप माध्यमातून पोषण, काळजी याची माहिती दिली जाणार आहे. ‘एक घास मायेचा’ ही खास पाककृतींची व्हिडिओ मालिका तयार करण्यात आली असून त्याद्वारे माता आणि बालकांसाठी विविध पाककृतींचे प्रात्यक्षिक आदी दाखवण्यात येणार आहे. ‘आजीबाईच्या गुजगोष्टी’ या अ‍ॅनिमेटेड मालिकेतून लोकांच्या मानसिक परिवर्तनाबाबत रंजक गोष्टींच्या माध्यमातून संदेश दिले जाणार आहेत. ‘पोषणासाठी वडिलांची भूमिका’ ही मोहीमदेखील व्हिडिओच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.
कोरोना साथीच्या काळात पोषण आहार योजनेची, तसेच राष्ट्रीय पोषण माह-२० च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आला. स्तनदा माता, बालके यांना पोषण आहाराबाबत माहिती, मार्गदर्शन यासाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म महिला व बालविकास विभागाकडून सुरू करण्यात आला आहे. सर्वदूर लोकशिक्षण आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

About the author

Abhivrutta Bureau

Chief Editor
Shilpa Wakalkar
email : abhivrutta.enews@gmail.com
contact : 9730920288

Add Comment

Click here to post a comment