मुंबई

कृषिमंत्री दादाजी भुसेंची मोठी घोषणा,रब्बी हंगामासाठी अनुदानी बियाणे

(Last Updated On: November 3, 2020)

मुंबई : कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्यात चालूवर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी ३ लाख १३ हजार ५८६ क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकºयांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात येत आहे. सुधारित तंत्रज्ञानावर आधारित गहू १८३० हेक्टर, हरभरा २६, ८२१ हेक्टर, मका (संकरित) २९३ हेक्टर, रब्बी ज्वारी २,४६० हेक्टर, करडई १,५१० हेक्टर, जवस १,०५० हेक्टर, ऊस पिकामध्ये आंतरपीक हरभरा २५०० हेक्टर असे एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे.

रब्बी हंगामामध्ये नवीन विकसित केलेल्या सुधारित-संकरित वाणांचा प्रसार करण्यासाठी अनुदानित दराने शेतक?्यांना बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, कृभको या बियाणे पुरवठादार संस्थांमार्फत अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येते. १० वर्षांच्या आतील वाणांच्या बियाण्यासाठी गहू दोन हजार रुपये क्विंटल, हरभरा २,५०० रुपये क्विंटल, मका (सं) ७,५०० रुपये क्विंटल, रब्बी ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल यानुसार अनुदान देय आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियान अंतर्गत ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून, उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला.