मुंबई

एसटीतर्फे नाथजल शुद्धपेयजल योजना

(Last Updated On: November 3, 2020)

मुंबई : एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळण्याच्या उद्देशाने नाथजल शुद्ध पेयजल राबवण्यात येणार आहे़ परिवहन मंत्री तसेच एस.टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते आज योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
सदर योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचे अधिकृत बाटली बंद पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे त्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गुरूला ‘नाथ’ या नावाने संबोधले जाते़ त्यांच्या आदराप्रित्यर्थ एसटीच्या अधिकृत बाटलीबंद पेयजलास ‘नाथजल’ ( nath jal ) असे नाव देण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर एसटी महामंडळाचे अधिकृत पेयजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरामध्ये शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात बाटलीबंद पाणी पुरवण्यासाठी मे. शेळके बेव्हरेजेस प्रा.लि. पुणे संस्थेची निवड करण्यात आली असून, सर्व बसस्थानकावर 650 मिलीमीटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असेल. बाटलीचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका असेल, अशी माहिती एस.टी. महामंडळाकडून देण्यात आली आहे.
——