मुंबई

अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम

(Last Updated On: November 3, 2020)

मुंबई : अनाथ बालकांचा अनाथालयात प्रवेश झाल्यानंतर त्यांना तातडीने अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. गेल्या वर्षभरात दाखल झालेल्या अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. तसेच,अनाथ तरुणांना बारावी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.
अनाथ बालकांच्या हक्कांसंदर्भात राज्यमंत्री कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी विविध समस्यांचा आढावा घेऊन निर्देश दिले. यावेळी विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आ. राजकुमार पटेल उपस्थित होते. बालसंगोपन योजनेचे आणि संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान एखादे अनाथ मूल संस्थेत दाखल होताच त्याच्या नावावर दरमहा जमा करावे. या दोन्ही योजनेचे अनुदान दरमहा त्याचे नावे जमा केल्यास १८ व्या वर्षी त्याच्या हाती मोठी रक्कम येईल. म्हणजे तो सक्षम आणि सनाथ होईल, असे श्री.कडू यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत किती अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र दिले, याबाबतची माहिती सादर करावी. प्रमाणपत्र नाकारण्यात आलेल्यासंदर्भात सुनावणी घेण्यात यावी. अनाथालय अथवा अनाथ आश्रम संस्थेतून बाहेर पडलेल्या अनाथांची माहिती गोळा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अनाथ बालके संस्थेत दाखल झाल्यानंतर एक वर्षाच्या आत त्यांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात यावे. यावर्षी दाखल झालेल्या व अद्याप प्रमाणपत्र न मिळालेल्यांसाठी येत्या १४ नोव्हेंबरपासून विशेष मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.              अनाथ बालकांची व्याख्या बदलण्याची गरज असून ज्या बालकांना कोणीही नातेवाईक नाही, अशा बालकांना संपूर्ण अनाथ समजून त्यांचा अ गट करावा आणि ज्यांचे पालक नाहीत, मात्र त्यांची जात माहित आहे, अशा बालकांना ब गटात सामावून घेण्यासंदर्भात बदल करणे आवश्यक आहे. नोकºयांमधील अनाथांसाठी असलेला आरक्षणाचा निकष हा एकूण रिक्त पदाच्या एक टक्केनुसार असावा, यासाठी पाठपुरावा करण्याबाबत सूचना केल्या.