Home प्रादेशिक विदर्भ रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणे वाटप

रब्बी हंगामासाठी अनुदानावर बियाणे वाटप

66

अमरावती : कृषी विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारित व संकरित वाणांच्या प्रसारासाठी कृषी विभागामार्फत ग्रामबीजोत्पादन योजनेंतर्गत रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. यामुळे शेत उत्पादनवाढीस चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
शासनाकडून कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसेच बियाणे व लागवड साहित्य उपअभियानाअंतर्गत ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात रब्बी हंगामासाठी राज्यभरात ३ लाख १४ हजार क्विंटल अनुदानावर वितरित होणार आहे. त्यासाठी शासनाने ६२.७९ कोटींची तरतूद केली आहे. त्यासोबतच, शाश्वत उत्पन्नवाढीसाठी विविध पीक प्रात्यक्षिकेही राबविण्यात येणार आहेत.
यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक असे वातावरण आहे. विविध योजनेंतर्गत गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, करडई, जवस या पिकांसाठी पीक प्रात्यक्षिके व अनुदानित दराने बियाणे पुरवठा यासाठी बियाण्याचे परिपूर्ण नियोजन आवश्यक आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून उत्पन्नात शाश्वत वाढ करण्यासाठी समूह (क्लस्टर) पद्धतीने प्रात्यक्षिकेही घेण्यात येणार आहेत. सर्वदूर अनुदानावर बियाणे वितरण व प्रात्यक्षिकांचे नियोजन करून कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री ठाकूर यांनी केल्या आहेत.