Home मनोरंजन ... चित्रपट,संगीत,नाटक,नृत्य अतुलनीय अतुल

अतुलनीय अतुल

115

अतुल कुलकर्णी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव. सात भाषांमधील ७० पेक्षा अधिक चित्रपटांतून अभिनयाची छाप सोडणारे अतुल अभिनेत्यासोबत निर्मातेही आहेत.
अतुल कुलकर्णी मूळचे बेळगावचे असून त्यांचे बालपण सोलापुरात गेले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. सुरुवातीला त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला; परंतु मन न रमल्याने इंग्रजी साहित्यात आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिकत असतानाच ते अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत होते.


अतुल बारावीत नापास झाले होते. याविषयी एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ते खूप महत्त्वाचे आणि आयुष्याला कलाटणी देणारे वळण होते. मी हुशार विद्यार्थी असतो, बारावी उत्तम गुणांनी पास होऊन इंजिनीअरिंगला व्यवस्थित पास झालो असतो, तर मी वेगळा माणूस झालो असतो. मात्र बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवले. हे अपयश पचवून त्यापुढील तीन-चार वर्षे बीए पूर्ण होईपर्यंत ते अगदी ‘नॅशनल स्कू ल आॅफ ड्रामा’ला प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये याच काळाने बरंच काही शिकवले. नापास होणे, इंजिनीअरिंग सोडून परत येणे आणि त्यानंतर मी बी.ए. होणे ते एनएसडीला जाण्याचा निर्णय घेईपर्यंतचा सात-आठ वर्षांचा काळ मोठ्ठं वळण होते. थोडक्यात म्हणजे तो यू टर्न होता. त्या सगळ्या काळात खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात, असे मला वाटते. कॉलेजमध्येच ‘नाट्य आराधना’ या ग्रुपमध्ये अतुल कुलकर्णी सहभागी झाले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर अतुल कुलकर्णी यांना नट म्हणून रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी नवी दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’ संस्थेत प्रवेश घेतला. येथेच त्यांची ओळख गीतांजली यांच्यासोबत झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात झाले.२९ डिसेंबर १९९६ रोजी अतुल आणि गीतांजली ( GEETANJALI ) पुण्यात विवाहबंधनात अडकले. ‘खुपते तथे गुप्ते’ या मराठी कार्यक्रमात त्यांनी त्यांची प्रेमकथा उलगडून सांगितली होती. ते म्हणाले, मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. गीतांजलीसोबत माझा विवाह माझ्या घरच्यांनाही आश्चर्याचा धक्का होता.
अतुल यांना हे राम (२०००) आणि चांदनी बार (२००२) चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्टÑीय पुरस्कार मिळाला आहे. आत्तापर्यंत अतुल यांनी अनेक मानसन्मान प्राप्त केले. अतुल कुलकर्णी नेहमीच सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमधून उघडपणे मते मांडतांना दिसतात. हे राम, चांदनी बार, खाकी, पेज ३, रंग दे बसंती, वळू, नटरंग, पोपट, एका प्रेमाची गोष्टसारख्या हे त्यांचे गाजलेले चित्रपट. आगामी ‘सिंग्युलॅरिटी’ त्यांनी हॉलीवूडमध्ये एंट्री केली आहे. दरम्यान, मनकर्णिका चित्रपटात अतुल कुलकर्णी यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली आहे. अतुल यांचा जन्म कर्नाटकात झाला असल्याने साहजिकच त्यांना कन्नड भाषा अवगत आहे. त्यामुळे त्यांनी कन्नडशिवाय तेलुगु, मल्यायम, तामिळ अशा प्रादेशिक चित्रपटातही अभिनय साकारला आहे.
अतुल यांच्या अतुलनीय कामगिरीला ‘अभिवृत्त’ च्या वतीने शुभेच्छा!

*****