Home मुंबई शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी : शालेय शिक्षणमंत्री

शिक्षक, विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी : शालेय शिक्षणमंत्री

47

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. त्या आज प्रसार माध्यम प्रतिनिधींसोबत अनौपचारिक चर्चा करत होत्या.
कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात आॅनलाईन शिक्षणपद्धती ( online education ) अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत व त्यांनी शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू ठेवले आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी परंपरागत पद्धतीने मिळणारी सुट्टी या वर्षीही देण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
अकरावी महाविद्यालय प्रवेशासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाधिवक्ता व संबंधित यंत्रणेशी चर्चा करून लवकरच अकरावी महाविद्यालयाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला जाईल. कॉलेज सुरू व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेमुळे विलंब होतो आहे; परंतु आॅनलाईन अकरावी वर्गाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे, याबद्दल प्रा. गायकवाड यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या काळात कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक रुची वाढावी व त्यांचे ज्ञानभांडार समृद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास प्रा.गायकवाड यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here