Home उपराजधानी नागपूर महाराष्ट्रातही संपूर्ण फटाकेबंदी करावी : डॉ. रवींद्र भुसारी

महाराष्ट्रातही संपूर्ण फटाकेबंदी करावी : डॉ. रवींद्र भुसारी

97

नागपूर : राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही दिवाळी काळात संपूर्ण फटाकेबंदी जाहीर करावी, अशी मागणी फटाकेविरोधी अभियानाचे प्रणेते तसेच सहयोग ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रवींद्र भुसारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या उत्सवांचे स्वरुप भारतीय संस्कृतीला साजेसे असावे अशी सर्वसाधारण अपेक्षा आहे. आज प्रत्येक उत्सव आणि उत्साहाचे प्रसंग अतिरेकी पद्धतीने साजरे करण्याकडे अधिक कल वाढला आहे, ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. याशिवाय कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जगासह आपलाही देश दहशतीत जगत आहे. कोरोनाच्या संसर्गाने आज राज्यातील लाखो लोक ग्रस्त आहेत. त्यातून बरे झालेले अद्याप पूर्णपणे स्वस्थ झाले नाहीत. त्यांना श्वसनाचे विकार नव्याने कधीही बळावू शकतात, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही फटाक्यांचा विषारी धूर आणि कचरा घातक आहे. या पार्श्वभूमीवर किमान यावर्षी तरी फटाके विक्रेत्यांना दिलेले सर्व प्रकारचे परवाने रद्द करावेत आणि महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात संपूर्ण फटाकेबंदी जाहीर व्हावी, असे निवेदनात म्हटले आहे.
मागील ३० वर्षांपासून राज्यात फटाकेविरोधी अभियान राबवत येत आहे. शाळा-महाविद्यालयांमधून जागरुकता अभियान राबवून एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आजवर फटाके न फोडण्याची शपथ देण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेही आमच्या बाजूने निकाल दिलेत आणि सरकारने त्यावर विचार करावा,असे सूचविले होते. मात्र, इच्छाशक्तीच्या अभावामुळे फटाकेविरोधी लढ्यास अद्याप संपूर्ण यश आलेले नाही.

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी : आरोग्यमंत्री

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील राजस्थान सरकारने येत्या दिवाळीत राज्यात फटाक्यांवर संपूर्ण बंदी जाहीर करून एक चांगले पाऊल उचलले आहे. त्याच धर्तीवरील निर्णय महाराष्ट्र सरकारने पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्य संरक्षणासाठी घ्यावा, असे डॉ. रवींद्र भुसारी यांनी म्हटले आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांचा पुरोगामी माणुसकीप्रधान विचारांचा वारसा आपण पुढे चालवत आहात. या परिवर्तनाच्या कार्यात आपणसुद्धा सहभागी होऊन राजस्थान सरकारप्रमाणे वैज्ञानिक निर्णय घ्यावा, अशी विनंती मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.