रोजगार...दिशादर्शक व्रत

कोरोना संकटकाळात १ लाख १५ हजार बेरोजगारांना रोजगार

(Last Updated On: November 7, 2020)

जानेवारी ते आॅक्टोबर २०२० दरम्यान एकूण १ लाख ४८ हजार ३४३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे़ यात आॅक्टोबर महिन्यातील संख्या ३० हजार ५०० इतकी आहे.

मुंबई : कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले आॅनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे लॉकडाऊन काळात आॅक्टोबर अखेरपर्यंत एकूण १ लाख १५ हजार ९२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आॅक्टोबरमध्ये विभागाकडे ५५ हजार ८९० इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात २० हजार ७९३, नाशिक विभागात ५ हजार ३७५, पुणे विभागात १४ हजार ५७७, औरंगाबाद विभागात ९ हजार ९१५, अमरावती विभागात २ हजार ७१७ तर नागपूर विभागात २ हजार ५१३ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
मागील महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३० हजार ५०० उमेदवार नोकरीस लागले. यात मुंबई विभागात सर्वाधिक १६ हजार ३४९, नाशिक विभागात १ हजार ४५८, पुणे विभागात ७ हजार ५६५, औरंगाबाद विभागात ३ हजार १०६, अमरावती विभागात १ हजार १४५ तर नागपूर विभागात ८७७ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

आॅनलाईन मुलाखती
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर आॅनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. व्हॉटस्अप, स्काईप, झूम इत्यादी माध्यमांद्वारे आॅनलाईन मुलाखती घेण्यात येतात. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न होत असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉपोर्रेट्स यांनीही सदर वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.