Home राजधानी मुंबई मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जिवित करण्याला प्राधान्य

मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जिवित करण्याला प्राधान्य

63

मुंबई : काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते; पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे पुढील काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जिवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ‘पॅनोरमा इन्विशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप सत्रात महसूलमंत्री थोरात बोलत होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, यांच्यासह अशोक राणे, नानू जयसिंघानी, वर्षा उसगावकर, अमित भंडारी आदी उपस्थित होते.
आज मराठी चित्रपट गावागावात पोहोचणे आवश्यक असून यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत आॅनलाईन माध्यमाचा वापर करून अशा वेगळ्या पद्धतीचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले याचा आनंद होत आहे. तीन दिवस झालेल्या चर्चासत्रात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. मनोरंजन क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण ठरवताना या चर्चासत्रातील सूचनांचा विचार केला जाईल. चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी या विषयातील तज्ञांकडून ठोस सूचना मिळतील, असा विश्वास मंत्री थोरात यांनी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, की
महाराष्ट्र हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. या अनुषंगाने प्रस्तावित चित्रपट, मनोरंजन व माध्यम धोरण असावे या हेतूने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पुढील काळात या कलाक्षेत्राला चांगला आकार देण्याचा प्रयत्न राहील. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सूचनांच्या आधारे धोरणाबाबतचा मसुदा तयार करावा. हा मसुदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मांडून, चर्चा करून त्यांच्या सूचनांसह या क्षेत्राला उभारी देऊ, असा विश्वास श्री.देशमुख यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here