मुंबई

मंदिरासंबंधी निर्णय दिवाळीनंतरच : मुख्यमंत्री

(Last Updated On: November 8, 2020)

मुंबई : दिवाळीनंतर मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ. कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप काळजी घेण्याची, ज्येष्ठांना जपण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राच्या हितासाठी टीका झाली तरी चालेल; परंतु माझ्या महाराष्ट्राचे आणि जनतेचे हित जपणारच़ मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवावी़ आरे कारशेड प्रकरणी होणाºया टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ. तसेच, मुंबईकरांच्या हितासाठी सुविधांची उभारणी करताना त्यात कुणीही मीठाचा खडा टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले.
‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’अभियानाला मोठे यश
कोरोना नियंत्रणात शासनासोबत राज्यातील जनतेला सहभागी करून घेण्यासाठी ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले. यात 60 हजार टीम सहभागी होऊन त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या तपासणीमध्ये साडे तीन लाख आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. 13 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जाणवले तर 8 लाख 69 हजार 370 लोकांना मधुमेह असल्याचे लक्षात आले. 73 हजार लोकांना हृदयरोग तर 18843 लोकांना कर्करोग असल्याची माहिती यातून मिळाली. 1 लाख 6 हजारांहून अधिक लोकांना इतर आजार असल्याचे दिसून आले. अभियानात 51 हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. घरोघरी जाऊन राज्यातील लोकांची आरोग्य तपासणी केल्यामुळे राज्याचा आरोग्यविषयक नकाशा यातून स्पष्ट झाला.
दंडात्मक कारवाई
मास्क न वापरणे ही गोष्ट अजिबात चालवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 400 जणांना बाधित करू शकतो. ते 400 जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

बिहारमध्ये दिवाळी कुणाची ? ‘निक्काल’ कुणाचा ?