Home राजधानी मुंबई प्रदूषण, गर्दी टाळून दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

प्रदूषण, गर्दी टाळून दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

72

मुंबई : दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा. सुख-समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी समाज माध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला.
मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे़ जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही़ मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन अशा त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना बेफिकीरीने न वागण्याचाही इशारा त्यांनी दिला.

कोरोनाशी कडवा लढा सुरू असतानाच महाराष्ट्राने अनलॉक काळात उद्योगक्षेत्रात मोठी झेप घेतल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, की पहिल्या टप्प्यात 17 हजार आणि दुसºया टप्प्यात 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली. महाराष्ट्रात गुंतवणूक केलेल्या उद्योजकांना आवश्यक असलेल्या जमीन आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोरोनाकाळात महाराष्ट्रात करण्यात आलेल्या उपाययोजना, जनतेचे सहकार्य आणि महाराष्ट्राची एकूण प्रतिमा याचे हे फलित असल्याचेही ते म्हणाले.

कोरोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदूषणामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकते, याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना प्रकाशपर्व दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.
दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, की इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.