मुंबई

गृहमंत्र्यांनी केला जिगरबाज पोलिस सावंत यांचा सन्मान

(Last Updated On: November 9, 2020)

मुंबई : जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाºया आबा सावंतसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे,असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज काढले.
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध कारवाई करताना वाहतूक पोलिस आबा सावंत यांना त्या चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेले. तरीही मोठ्या हिम्मतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. यानिमित्ताने गृहमंत्री देशमुख यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी सावंत यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
गृहमंत्र्यांनी आबा सावंत यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. सदर घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारली आणि त्यांचे कौतुक केले.
आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आबा सावंत यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान,आबा सावंत हे लातूर जिल्ह्यातील किल्लारीचे रहिवासी आहेत.
या छोटेखानी कार्यक्रमाला पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते.

घटना अशी
5 नोव्हेंबर 2020 च्या सायंकाळी चारच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथील अहिंसा चौकात वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विनामास्क फिरणाºयांवर कारवाई करत होते. यावेळी चिंचवड स्टेशन चौकाकडून चाफेकर चौकाकडे युवराज हणवते हा व्यक्ती चारचाकीतून निघाला होता. त्यांचा मास्क तोंडावर नसून गळ्याजवळ असल्याचे दिसून आल्याने कारवाईसाठी त्यांना हात दाखवला. यावेळी आबासाहेब सावंत आले. हणवतेने आपण थांबलो आहो, असे दर्शवत गाडीचा वेग वाढवला आणि सावंत यांच्या पायाला धक्का लागला. यावेळी त्यांना बोनेटच्या दिशेने तोल गेला. ते खाली उतरणार तोवर हणवतेने वेग वाढवला. ही बाब काही उपस्थित दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी पाहिली. अन्य वाहनांनी त्याचा पाठलाग करताच हनवते याने चाफेकर चौकात पोहचताच वेग आणखी वाढवला. मात्र, त्याचे वाहन चिंचवड पोलिस ठाण्यासमोर आले असता दोन्ही बाजूंनी दोन दुचाकीस्वार आणि पुढे एक रिक्षा असे घेरण्यात आले आणि सावंत यांचे प्राण बचावले.

पोलिस शिपाई वाहनाच्या बोनेटला असे धरून होते.
पोलिस शिपाई वाहनाच्या बोनेटला असे धरून होते.