मुंबई

कोळसा हानी टाळण्यासाठी ड्रोनचा वापर व्हावा

(Last Updated On: November 11, 2020)

मुंबई : अनावश्यक खर्चात शक्य ती बचत करून महानिर्मितीने आपली आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी मुख्यत्वे कोळसा इंधन खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोळसा वहन हानी टाळण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करावा, असे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी नितीन राऊत यांनी दिले.
‘व्हिजन-2030 साठीचा नियोजन आराखडा’ विषयावरील अभिनव संकल्पनेअंतर्गत मुंबई मुख्यालय येथे झालेल्या महानिर्मितीच्या आढावा बैठकीत डॉ.राऊत ( energy minister ) बोलत होते.
अतिरिक्त कोळसा वहन खचार्मुळे तुलनेने काहीसे जास्त वीजदर असलेले परळी, नाशिक, भुसावळ येथील वीजसंच कार्यरत ठेवण्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोन अंगिकारून खुल्या बाजारातील संधी शोधणे गरजेचे आहे, असेही मत मंत्री राऊत यांनी व्यक्त केले.
बैठकीत एनर्जी मिक्स सारखी नवी संकल्पना, एनर्जी आॅडिट, आगामी काळात जलविद्युत निर्मिती क्षमता, कार्यक्षमता वाढविण्याची संभाव्यता लक्षात घेऊन त्यासाठी विशेष पथकाची निर्मिती, प्रकल्प विहित वेळेतच पूर्ण करण्याची निकड, उरण वायूविद्युत केंद्राचे अत्याधुनिकीकरण व क्षमतावाढ, महानिर्मितीला स्वत:च्या मालकीच्या गरे पालमा -2 कोळसाक्षेत्राच्या विकसन प्रक्रियेला गतिमान करण्याची निकड, तिथेच खाणीनजिक रिजेक्ट कोळशावर आधारित वीज प्रकल्प उभारण्याची संभाव्यता, गोसेखुर्द सारख्या विशाल जलसाठ्यावर तरंगते सौर प्रकल्प उभारणी, राखेची उपयोगिता वाढविण्यासाठीच्या विविध प्रभावी उपाययोजना, वीज वहनातील गळती कमी करण्यासाठी पारेषण या यंत्रणेशी योग्य समन्वय आदी महत्त्वपूर्ण बाबींवर देखील चर्चा करण्यात आली.
बैठकीस महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक (प्रकल्प) थंग पंडियन, प्रभारी संचालक (संचालन) राजू बुरडे, कार्यकारी संचालक (संचालन) अभय हरणे, कार्यकारी संचालक (राख व सौर) कैलास चिरुटकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) संजय मारुडकर आदी अधिकारी उपस्थित होते