मुंबई

मतदार यादी विशेष पुन: निरीक्षण कार्यक्रम १७ नोव्हेंबरपासून

(Last Updated On: November 15, 2020)

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन: निरीक्षण कार्यक्रम 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मतदारयादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी मिळणार आहे.
1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदारयाद्या 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील असे मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतील. तसेच, याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती 15 डिसेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.
दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 5 जानेवारी 2021 पर्यंत आहे. डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणीयाद्यांची छपाई आदी 14 जानेवारी 2021 पर्यंत करून 15 जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल. पुन:निरीक्षण कार्यक्रमादरम्यान दोन शनिवार आणि दोन रविवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रांच्या ठिकाणी विशेष मोहिमेचे (स्पेशल कॅम्पेन) आयोजनही करण्यात येणार आहे.
पूर्वीच्या यादीतील मयत झालेल्या, इतरत्र स्थलांतरित झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. अशा वगळण्यात आलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकत्यार्ची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( booth level officer-blo ) यांच्या मदतीने याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. आॅनलाईन अर्ज नोंदणीची सुविधा http://www.nvsp.in वेबपोर्टलवरही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.