Home राजधानी मुंबई दिवाळी सणासंबंधी मुख्यमंत्र्यांचे  आवाहन

दिवाळी सणासंबंधी मुख्यमंत्र्यांचे  आवाहन

75

मुंबई : दीपावलीच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद जरूर घ्या;पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( udhhav thakare cm of maharashtra ) यांनी आपल्या नागरिकांना केले आहे. आपण स्वत: केवळ सोशल मीडिया, ई-मेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता घरीच हा सण साजरा करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाला सणवार कळत नाही. लस जेव्हा येईल आणि आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे आणि घरातले-बाहेरचे यांनाही संसर्ग होऊ न देणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. मागील सात-आठ महिन्यात आपण सर्वधर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचे पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो आहोत, हे विसरता येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो, तरी दुसरीकडे हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस सणवार विसरून कोरोनाशी लढताहेत़ त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. या कर्मचाºयांत आपली आई, वडील, भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्र कुणीही असू शकते. त्यांच्यावरचा ताण न वाढू देणे आणि घरातच राहून सुरक्षितरित्या दिवाळी साजरे करणे याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू करायचे आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. त्यामुळे या दिवाळीतही मास्क घालणे- हात धुणे- अंतर पाळणे ही त्रिसूत्री पाळा आणि आता हिवाळा असल्याने श्वसन रोगाला आमंत्रण देऊ नका, आपले आईवडील, ज्येष्ठ मंडळी घरात आहेत याची जाणीव ठेवा, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.