नागपूर

शहीद जवान भूषण सतई अनंतात विलीन, आसवांनी दिला निरोप

(Last Updated On: November 17, 2020)

नागपूर : जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात मंत्रोपचाराने सोमवारी अंत्यविधी पार पडला. यावेळी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद वीरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी दिला.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अपर्ण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली़ तसेच, कुटुंबियाचे सांत्वन केले़ अंत्यसंस्काराचा विधी संपूर्ण शासकीय इतमामात पार पडला.
शहीद भूषण सतई यांना ब्रिगेड आॅफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवरून काटोल येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरी ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे वडील रमेश सतई, आई मीराबाई सतई तसेच आप्तजनांचे सांत्वन केले.
शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी संपूर्ण काटोल शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काटोलकरांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार अनिल महात्मे, खासदार कृपाल तुमाने, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, नगराध्यक्षा वैशाली ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभेजवार, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर, उपविभागीय अधिकारी उंबरकर, तहसीलदार अजय चरडे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चरणसिंग ठाकूर, तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, शहीद सुपुत्राचे आप्तजन उपस्थित होते. यावेळी लाखोच्या संख्येने काटोलकर व परिसरातील जनता उपस्थित होती. ‘भारत माता की जय’ च्या घोषणेत परिसर निनादून गेला होता.
शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून काश्मिर खोºयातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्कराचे चार जवान शहीद झाले होते. यात काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले.