राज-सत्ता

नितीश कुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी

(Last Updated On: November 17, 2020)

पाटणा : नितीश कुमार यांनी सोमवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा शपथ घेतली. या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, सुशील मोदी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. विरोधी पक्षातील महाआघाडीने मात्र कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.
राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार यांच्यानंतर भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी शपथ घेतली. जेडीयूच्या वतीने विजय चौधरी, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मेवालाल चौधरी, शीला कुमारी यांनी शपथ घेतली.
हिंदुस्तानी आवाम मोर्चाच्या वतीने संतोष सुमन तर विकासशील इंसान पार्टीच्या वतीने मुकेश सहानी यांनी शपथ घेतली. भाजपच्या वतीने तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांच्याशिवाय मंगल पांडेय, अमरेंद्र्र प्रताप, रामप्रीत पासवान, जीवेश कुमार, रामसूरत राय यांनी शपथ घेतली.
दरम्यान, भाजपच्या वाटाघाटीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात जागा वाटपापासून ते सत्तेतील वाटणीपर्यंत सगळा अनुभव पाठीशी असल्याने पक्षनेतृत्वाने फडणवीसांना ही मोठी जबाबदारी दिली होती.