अमृता...womenworld

कोविडकाळात नवजात शिशु,मातांची काळजी

(Last Updated On: November 19, 2020)

कोविड संसर्गाच्या काळात नवजात बालक व मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, या काळात नवजात शिशु व माता मृत्यूदर कमी करण्यासाठी गर्भवतीचे आरोग्य व पोषण आहार, रुग्णालयातील सुविधा व निमवैद्यकीय कर्मचाºयांचे प्रशिक्षण यावर लक्ष देणे आवश्यक आहे. माता व नवजात शिशु मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेणे काळाची गरज असल्याचे मत आरोग्य विभाग, युनिसेफच्या वतीने नवजात शिशु सप्ताहानिमित्त आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आले.महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्यावतीने राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त आॅनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादातील चर्चेनंतर सहभागी संस्थांच्या वतीने डॉ. मृदुला फडके यांनी संयुक्त निवेदन सादर केले.
डॉ. मृदुला फडके म्हणाल्या, की पाच वर्षांखालील बालकांचे तसेच मातांचे मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राने चांगली प्रगती केली आहे. सन 1997 ते 2016-18 या दरम्यान राज्यातील माता मृत्यूदर हा 166 वरून 46 एवढा खाली आला आहे. तर पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर हा सन 2007 ते 2018 दरम्यान 42 वरून 22 वर आला आहे. माता मृत्यू व बालक मृत्यूदर आणखी खाली आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा, प्रसुती केंद्रातील सुविधांचा दर्जा राखणे, नवजात बालक केअर युनिटची सोय, सर्वच बालकांना समान सोयी आदींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रसूती खोलीत बाळंतीण व नवजात शिशुची योग्य ती काळजी घेतली जावी.
कोविड काळात गर्भवती महिला, नवजात बालके व मातांची योग्य काळजी घेण्यात यावी. सर्व आरोग्य विषयक यंत्रणांनी प्रसुतीच्या वेळी संरक्षणात्मक उपकरणे पुरवावीत तसेच शारीरिक अंतर राखणे, मुखपट्टी वापरणे, वारंवार हात धुणे, श्वसनसंबंधी स्वच्छता राखणे आदी काळजी सर्वच संबंधितांनी घ्यावी. यासाठी सामाजिक संस्था, आरोग्य विषयक काम करणारे व्यावसायिक व आरोग्य यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
डॉ. राजेश्वरी चव्हाण यांनी महिलांच्या विशेषत: गर्भवती महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे माता मृत्यू व बाल मृत्यू होत असल्याचे सांगितले. त्यासाठी महिलांनी अनिमिया दूर करून आरोग्याकडे लक्ष द्यावे. कोविड काळात महिलांमध्ये जनजागृतीसाठी आरोग्य विभाग, युनिसेफ यांच्या सहकायार्ने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये सायकोसोशल सपोर्ट सेंटरच्या माध्यमातून नागरिकांचे मानसिक प्रबोधन करण्यात येत असल्याचे श्रीमती चव्हाण यांनी सांगितले.
गायनॅकोलॉजिस्ट असोसिएशनच्या डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या की, कोविड काळात माता व नवजात शिशुंची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रधानमंत्री मातृत्व अभियानाच्या माध्यमातून खासगी डॉक्टरही प्रबोधन करत आहेत. नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. एल.एस देशमुख यांनी सांगितले, की नवजात बालक मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘कांगाऊ मदर केअर’ संकल्पना राबविण्यात यावी. तसेच, आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे,जेणेकरून बालक जन्मल्यानंतर पहिल्या काही तासात त्याची योग्य ती काळजी घेतली जाईल.
पेडियाट्रिशियन प्रा. प्रमोद जोग यांच्यानुसार, वेळेपूर्वीच बालकांचा जन्म, विषाणू संसर्ग यामुळेही बालमृत्यू होत आहेत. हे मृत्यू टाळण्यासाठी बालक व मातांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा. डॉ. अपर्णा श्रोत्री यांनीही परिसंवादात सहभाग घेतला. युनिसेफच्या स्वाती मोहपात्रा व खणेंद्र भुयान यांनी परिसंवादाचे संचालन केले.

*****

About the author

Abhivrutta Bureau

Chief Editor
Shilpa Wakalkar
email : abhivrutta.enews@gmail.com
contact : 9730920288

Add Comment

Click here to post a comment