मुंबई : सार्वजनिक खाजगी भागीदारीतत्त्वामुळे वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( medical education minister ) यांनी व्यक्त केला.
मंगळवारी वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सार्वजनिक खासगी भागीदारीतत्त्वाच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) संभाव्य धोरणासंदर्भात बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह डॉ. गुस्ताद डावर, डॉ. अजय भांडारवार, डॉ. संजय बिजवे, श्री. पागे उपस्थित होते. तसेच, आॅनलाईन मिटींगद्वारे टाटा हॉस्पिटलचे डॉ. राजन बडवे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. भावेश मोदी, डॉ.चंद्रशेखर उपस्थित होते.
सध्या कोविड-19 या विषाणूमुळे जगातील, देशातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. असे असले तरी यापुढील काळात सामान्य माणसालाही उत्तम रुग्णसेवा मिळणे गरजेचे आहे. याला प्राधान्य देण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीतत्त्वानुसार वैद्यकीय महाविद्यालये चालविता येतील का याबाबतची शक्यता तपासून घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील रुग्णसंख्या पाहता डॉक्टरांची संख्या वाढणे जितके आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देणेही आवश्यक आहे. महाराष्ट्रातील एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवडून याठिकाणी प्रयोग करून पाहण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत एका समितीने सार्वजनिक खासगी भागीदारीतत्त्वावर पूर्णपणे चालविण्यात येणारे टाटा हॉस्पिटल आणि गुजरात येथील हॉस्पिटलबाबत पूर्ण पाहणीअंती अहवाल द्यावा, असे मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.