लस लवकर येऊ दे, उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे

पश्चिम महाराष्ट्र

 

पंढरपूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, मानाचे वारकरी कवडूजी भोयर, कुसुम भोयर, नगराध्यक्ष साधना भोसले, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.
वघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र, काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचे आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे.
श्री विठ्ठल कोरोनाचे संकट दूर करेलच अशी समस्त भाविकांप्रमाणेच माझीही श्रद्धा आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी मास्क वापरणे. गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आदी गोष्टी काटेकोरपणे अंमलात आणाव्या लागतील, असेही ते म्हणाले.
श्री.पवार यांच्या हस्ते मानाचे वारकरी भोयर दाम्पत्य (मु.डौलापूर, पो.मोझरी, ता. हिंगणघाट जि.वर्धा) यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात येणार प्रवास सवलत पास सुपूर्द करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी 2021’ चे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *